माझा कान्हा
माझा कान्हा
तिन्ही सांज झाली आता
सांज दिवा लागे दारी
वाट पहाते यशोदा
येरे कान्हा लवकरी ||
झाली झाली चांद रात
गोवत्से आली दारात
माझा कान्हा का दिसेना
हूर हूर अंतरात ||
माझा कान्हा का न येइ
परतले सवंगडी
कुणी पहिला का हरी
साद घाली माय वेडी ||
वेणूनाद ऐकुनिया
माय धावे वाटेवरी
चाहूल मला लागली
आला माझा हो मुरारी ||
धावुनिया कान्हा येई
येई मायेच्या कुशीत
वात्सल्य ते पाहुनिया
धन्य झाला आसमंत ||
बिलगूनी कान्हा बोले
आई चल ना घरात
जेऊ घाल मज आई
क्षुधा लागली बहुत ||
पाट ताट मांडूनिया
तुझीच वाट पहाते
चल कान्हा लवकरी
तुला जेऊ मी घालते ||
पक्वान्नेही सेवुनिया
सेवी मधू नवनीत
प्रेम पान्हा पिउनिया
नंदलाला झाला तृप्त ||
सारी सृष्टी हि निजली
तू हि कान्हा झोपी जाई
घेई पापण्या मिटुनी
यशोदा गाते अंगाई ||
अर्थ -नवनीत -दूध
क्षुधा -भूक
सवंगडी -मित्र
सेवी -सेवन करणे