आक्रोश त्याचा तुला न कळला
अजुनी असा तू शांत का
बैसला निवांत का॥
दाही दिशा महापूर
दुःखाचा सागर
गहिवरला आसमंत
उध्वस्त झाले नगर
तुझ्या लेकरांचा तुला
ऐकू न येई आकांत का
अजुनी असा तू शांत का ॥
क्रूर तांडवा मध्ये या
सूर्यतेज माझा जाळला
जगण्याची धडपड त्याची
आक्रोश त्याचा तुला न कळला
बैसला पाषाण होऊनी
गहाण तुझा वेदांत का
अजुनी असा तू शांत का ॥
शब्द माझे चुकले आज
मला माफ कर
उरले सरले आहे जे
राख त्याला जमलंच तर
की अजुनी पाहणार तू
या प्राक्तनाचा अंत का
अजुनी असा तू शांत का
बैसला निवांत का ॥