विरहअग्नी

विरहअग्नी

लख्ख चांदण्यात रास रंगला असेल ना

कृष्ण बासुरीचा नाद निनादला असेल ना ||

आस तुला पाहण्याची

मज लागलीसे आज

कुठून मिळेनासी वाट

दही दिशा नजर कैद

आनंदाचा पूर तिथे ओसंडला असेल ना

लख्ख चांदण्यात रास रंगला असेल ना ||

अडकले मी बंधनात

घोर असे हा पहारा

कृष्ण कृष्ण अंतरात

बाह्य संसार पसारा

गोपामेळी मित मज शोधला असेल ना

लख्ख चांदण्यात रास रंगला असेल ना ||

गहिवरले नयनाश्रू

साहवेना मज विरहअग्नी

गुन्हा काय घडलासे

का न भेटी आनंदधनी

शोधूनि मलाही हृदय ते द्रवले असेल ना

लख्ख चांदण्यात रास रंगला असेल ना ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *